|| बाबुल्या उवाच ||

“जा बाबाला विचार की त्याला लहानपणी अभ्यास करायला सांगायला लागायचं का ते” आज्जी आणि नातवाचं गुफ्तगू कानी पडलं आणि मी कान टवकारले. “पण, आऽऽज्जी, व्हाय डु आय हॅव टु स्टडी ऑऽऽल द टाऽऽईम? “. प्रश्णावर प्रश्ण हा तर नवीन पिढीचा ट्रेडमार्क. आमच्या वेळी असलं नव्हत! पण प्रश्ण चांगला होता. उत्तराला मी मुलापेक्षा जास्त उत्सुक झालो.

“अरे… अभ्यास करून तुला बाबा सारखं मोठ्ठं व्हायचं आहे नं? ” आ‌ईने युक्तिवाद मांडला. “मोठ्ठं म्हणजे, दाढी ये‌ईल एवढ्ढंऽ मोठ्ठं? ” चिरंजीवांची शंका रास्त होती. त्याच्या खाती मोठेपणाच गणित हे दाढी, खिशांतलं क्रेडिट कार्ड आणि मोटारी चालवायचं लायसन्स, यावरच बांधलं होत. “अरे तसं मोठ्ठ नाही रे. ते तर तू होशीलच. पण छान नोकरी (आणि छोकरी, माझ्या मनातला विचार दुसरं काय) मिळेल एवढं मोठ्ठं. बाबाच्या लहानपणी तो फक्त अभ्यास करायचा. शाळेतून घरी आला की आपला आपला होमवर्क करून टाकायचा. असा पोगो आणि डिस्ने पाहत बसत नव्हता. ” आता हे म्हणजे जरा अतीच होत होतं. माझ्या बालपणीचा आनंदपट मांडताना आ‌ई विसरली होती की अभ्यासाची अक्कल आली तेव्हा मला चांगलं मिसरूड फुटलं होत. आमच्या वेळी पोगो नावाचा पोरकटपणा नसला तरी उनाडक्या करायला अनेक साधनं होती.

“हो का रे बाबुल्या? “. चिरंजीव हे कोणाला संबोधतायत हे पाहायला मी चमकून मागे वळून पाहिलं. बाबुल्या!! तीर्थरूपांना पहिल्या नावाने मारलेली हाक समजू शकतो, अगदी पितामह, पिताजी, डॅडी, डॅड, पप्पा पर्यंत ठीक होतं. पण मला ’बाबुल्या’ करून माझ्या बाळानं माझंच बारसं जेवलं होतं. हा म्हणजे शोनुल्या, मनुल्या, पिल्लुड्यातलाच प्रकार होता. मुलांना ’किमान’ वडिलांचातरी धाक हवा ह्या सौच्या बाळहट्टाला (बाळाच्या हितास्तव केलेला हट्ट! ) ह्याने तर गवसणी घातली होती. म्हणजे मां का प्यार आणि वडिलांचा धाक. बहोत ना‌ईन्साफी । 

“होमवर्क करायचो म्हणजे… फट्टाफट. असली कटकट तर अज्जिबात नव्हतो करत. ” मी अगदी छाती ठोकून उत्तर दिलं. मला वाटत ह्यालाच म्हणत असावेत सफेद झुठं. माझ्या पॉलीग्राफची सु‌ई रपारप वर खाली व्हायला लागलेली मुलाला दिसली असती तर त्याने, “लायर लायर पॅंटस ऑन फायर हॅंगींग ऑन अ टेलेफोन वायर” गाण्याची तुटकी रेकॉर्ड चालू केली असती. तेवढ्यात मराठेसरांनी ’भ’कारावरून चालू होणाऱ्या शिवीसोबत करकच्चून काढलेला चिमट्याच्या आठवणीने मी भानावर आलो. “अरे ****, तुला डोकं आहे तर टवाळक्या का करतोस. नीट अभ्यास कर लेका. ” सिगरेटीचा दमदार झुरका घे‌ऊन तांबूस लाल चेहऱ्याने, ते कळकळीने, म्हणजे अगदी चिमट्याची कळकळ जाणवे पर्यंत, आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेत सांगायचे. इतक्या कळकळीने दिलेली डोकं असल्याची ग्वाही चिमट्याच्या वळासोबतच विरून जायची आणि मी परत उनाडक्या करायला मोकळा व्हायचो. 
नजर भिरभिरत खिडकी बाहेर रणरणत्या उन्हात बहरलेल्या गुलमोहरावर गेली आणि आठवणींना मोहर फुटला. अश्याच एका गुलमोहरावर कापसाच्या बोळ्याने पॉलीनेशनचे प्रयोग करत मी चढून बसायचो. मी पॉलीनेट केलेल्या कोणत्याच फुलाला कधीही शेंग धरली नाही, वो बात और, पण प्रयोग मात्र तासंतास चालायचे. तो भाताचा गलका, त्यात कोरफड, त्यात चुकून फुटलेल्या किंवा चुकून फोडलेल्या बल्बच्या काचेची, आ‌ईच्या नकळत, चटणीच्या खलबत्त्यात केलेली कुटवड, तो धारदार मांजा, त्या पतंगी. काडेपेटीत पकडून ठेवलेले भुंगे, सुतळी बॉंब्सची सुतळीवजा केलेली बारुद आणि त्याला लागलेल्या आगी, दिवसभर क्रिकेट, लगोरी, जीवापेक्षा जास्त जपून ठेवलेल्या कंच्याच्या बरण्या, भोवरे, सुतळ्यांनी बांधून भर रस्त्यावर केलेली सायकल्सची ट्रेन, बोटमोजून आणलेलं कुत्र्याचं पिल्लू (१९ बोटी कुत्रं मालकाला लाभदायी असत म्हणे) आणि त्याच वर्षोनवर्ष चाललेलं ’बस’ म्हणाल्यावर बसायचं घरगुती ट्रेनिंग, हॉस्पिटलच्या मागे सापडलेल्या सला‌ईंच्या ट्युबांची बनवलेली गलोर आणि त्यांनी फोडलेल्या शेजाऱ्यांच्या काचा. ह्या सग्गळ्या उपद्व्यापांना वेळ होता तर आ‌ईच्या आठवणीतल्या माझ्या बालपणीच्या अभ्यासाला वेळ कुठून मिळायचा याचंच मला कोड आहे.

बाप रे ’बाप’
आपण लहानपणी लावलेल्या दिव्यांची उजळणी करता करता, हातातली कॉलेजबॅग जा‌ऊन डायपरबॅग आली, खिशातला कंगवा जा‌ऊन नाकं पुसायला रुमाल, आणि तरुणपण संपून बाप-पण. कॉलेज संपून कुर्यात सदा मंगलम ते कुर्यात बटो मंगलम पर्यंतचे दिवस आले आणि भुर्रकन उडून गेले. म्हणजे फार घा‌ई केली यातला प्रकार नाही. कॉलेज संपून पाळणा हले पर्यंत चांगली आठ, दहा वर्ष गेली. पण म्हणतात ना ला‌ईफ गेट्स ऍट यू. 
या सगळ्यात सर्वात गोडं आठवण ठेवून गेलं ते मुलांचं बालपण. नवीन पिढीतले नवोदित बापलोक अगदी नाळ कापे पासून ते रोजच्या डायपरीकरणा पर्यंत बायकोच्या सोबत असतात, अगदी बाटलीला बाटली लावून (दुधाची). बहुदा म्हणूनच की काय, ते मुलांसोबत लवकरच मैत्री होते. ’ए आ‌ई’ कशी आयुष्यभर मैत्रीणच राहते. तसं ’अहो बाबा’ चा बाबुल्या होण्यात मुलांसोबत लहानपणापासून लाभलेल्या जवळिकीचा परिणाम असावा असं वाटत. 

या बच्चे कंपनीचा इरसालपणा त्यांनी आ‌ईच्या पोटात बसून केलेल्या उलथापालथेवरुनच समजून घ्यायला हवा. बाहेर पडायची काय ती घा‌ई. आळोखे पिळोखे देत, एकेका लाथेसरशी ते बाहेरच्या जगाला आपल्या अस्तित्वाची आणि दांडगटपणाची जाणीव करून देत असावेत. बाहेरच्या जगाचं पहिलं स्वागत हे पिल्लू, आपल्या लालबुंद ओठांनी मिटक्या मारतं, चला… जेवणाची वेळ झाली म्हणून आरोळी ठोकून करतं आणि पाहिल्या टाहोतच आ‌ईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणतं. त्यात आ‌ईला पान्ह्याकरता ढुशी देता देता, त्याने बापाकडे एक जालीम कटाक्ष टाकल्याची पण मला शंका आहे. माझ्या आ‌ईपासून मला नाळ कापून दूर करणारा हाच तो राक्षस, हा त्यातला भाव असावा.

मग अनेक दिवसांच्या रात्री, आणि रात्रींचे दिवस. आपल्या एकेका अदांनी हा एक छटाक जीव, अख्ख्या घरादाराला गुंडाळून ठेवतो. त्याच ते झोपेतून खुदकन हसणं काय, अन नैनमटक्का करत लाजणं मुरडणं काय. एकादशीच्या चंद्रासारखी वाट पाहायला लावून उगवणारे बापलोक सातच्या आत घरात. घरी खेळायला नवीन खेळणं त्यांची वाट पाहत असतं. मॉलीश करताना पहिलवाना सारखं रगडून घे‌ऊन त्यांनी टाकलेले आनंदाचे चित्कार आणि दिगंबर अवस्थेत घातलेला निरागस धुडगूस म्हणजेतर लाजवाब. हे पिल्लू आपल्या आजारपणातून आ‌ईवडिलांना जवळ आणतं. दोन आठवडे रांगायला उशीर करून आ‌ईवडिलातले अवांतर वाद कमी करतं. “तो जोश्यांचा बाळू, दोन दिवसांनी लहान खरा, पण परवापासून रंगायला पण लागला. अन ही ठमाकाकू ढिम्म, पालथं पडून फक्त खेळण्याकडे बघतं पडते, सरकायचं नाव नाही. ” म्हणजे, चिंता करायला एक कॉमन कारण, बाकी वाद बंद. दोघही ह्या कन्यारत्नाला अनेक आमिष दाखवत रांगवण्यात रंगून जातात. यावेळेत टीव्ही, सिनेमे सब बंद. झुऽऽऽम.. बस्स इस्सको देखो. बालपण दे गा देवा, मुलांना, अशी मागणी अनेक पालकांकडून उप्परवाल्याकडे गेल्याची बातमी आहे. मला वाटतं, रात्री चुकून पायचा धक्का लागून केकाटणारी एक दोन खेळणीतरी आठवणीकरता घरात पेरून ठेवायला पाहीजेल होती. 

दिवस गेल्या पासून ते मुलं बालवाडीत जा‌ईपर्यंतचे दिवस म्हणजे आठवणीतल्या कोरीव लेण्या. नंतर पालकमहोत्सव संपतो अस नाही, पण तोवर मुलं कशी वाढवावी हा प्रश्न पडलेला नसतो. ती वाढतच जातात, आपो‌आप. त्यांच्या शिक्षणाचा आराखडा ते उपजतच घे‌ऊन येतात. त्यात पालकांचा हातभार म्हणजे बाकी पोरांशी तुलना करत चिंता करायची आणि आपली प्रतिकृती त्यात शोधण्यात वेळ घालवायचा. काही भेटायला येणाऱ्या धूर्त मित्रमंडळींना, मी बापाला बाजूला गाठून मुलं कसं डिक्टो त्याच्या सारखं दिसतं आणि आ‌ईला खोपच्यात घे‌ऊन काय हुबेहूब तुझी कॉपी आहे अशी थाप ठोकून बर्फी, पेढ्यांच्या पुड्यांवर ताव मारताना मी चीकटहात पकडलं आहे. या दरम्यान, मुलांचं कधी जेवायचं, चावायचं, रांगायचं, रडायचं, धावायचं, बोलायचं याच वेळापत्रक ठरलेलं असतं. ते जर का प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन्स च्या स्वरूपात छापून आलं असतं तर कित्तीतरी नवोदित पालकांच्या व्यर्थ चिंता दूर झाल्या असत्या. या दरम्यान, पोटात बसलेला गॅसचा दट्टू, पुस्तकं वाचून किंवा टीव्हीवरच्या आज्जीबा‌ईंचा उपदेश “ग्रा‌ईप वॉटर दे त्याला. मीपण तू लहान असताना तेच देत होते” हे एकूनपण शिकता येतो.

पण घरोघरी ज्ञानेश्वर तयार करण्याचा फॉर्म्युला तेवढा सरळसोट नाही. लायसन्सराजमध्ये, मोटार, स्कूटर, विमान चालवायला लायसन्स लागतं, साधी निरा विकायची तरीही तेच ’सरकार मान्य’. पण मला तरी कोणतं ट्रेनिंग करून, लायसन्स काढलेलं आठवतं नाहीये मुलं काढायला आणि वाढवायला. त्यात काय, सगळेच करतात, मला न जमायला झालंय काय? अश्याच एका असंभव आत्मविश्वासातून आधी लग्न!! त्यातून रांगता रांगता, पहिलं पा‌उलं टाकतो न टाकतो, तोच डबल स्ट्रा‌ईक. लग्न झाल्या झाल्याच ’गोड’ बातमीचे ’आंबट’ प्रश्न सुरू, “हं, आता गुड न्यूज कधी!? “. “अहो काकू, आत्ताच तर लग्न झालंय. अभी तो हमारे खेलने कुदने के दिन है।” असं म्हणायचं तर, “म्हणजेऽ, काही प्रॉऽब्लेम तर नाही ना? ” असा ’टोकेरी’ प्रश्न. त्यात तुम्ही याल का आम्हाला शिकवायला मुलं कशी वाढवायची ते, हे विचारायची पण सोय नाही. ह्यांच्याच पोराने दिवाळं काढून, आ‌ई-बापाचे रिटायरमेंट फंडस पळवलेले. 

आपल्या ह्या अनमोल क्रियेशनला, या ’जालिम दुनिये’ करता तयार करायचं म्हणजे सोप्पं काम नाही राव. त्याला चांगलं वा‌ईट समजायला हवं. “सौरभच्या बाबाने त्याला काय सांगितलं माहीती‌ए का? कोणाचा धक्का जरी लागला तरी त्याला दहा गुद्दे द्यायचे म्हणजे तो तशी चूक परत करत नाही. बाबा, सौरभने मला काल खूप मारलं. ” आता ह्यांना आपण गांधीगिरी शिकवायची की आं़ख के बदले आ़ंख? “पण मी आ‌ईच्या पोटात गेलोच्च कसा बाऽऽबा? “, ह्याला उत्तर देवानी पाठवलं की ’बाल’ब्रम्होपदेश द्यायचा? असे अनेक प्रश्ण मला “रीसेशन कधी संपेल? ” ह्या प्रश्णापेक्षाही लवकर सोडवणं जास्त गरजेच आहे. 

तात्पर्य म्हणजे, “टेन लिटल फिंगर्स ऍंड टेन लिटील टोज” पासून ते “व्हाय डु आय हॅव टु स्टडी ऑल द टा‌इम” हा प्रवास आता निर्णायक घडीला ये‌ऊन ठेपला आहे. मुलांना चांगलं कसं वाढवायचं? मुलमुली चांगली असतात म्हणून चांगली निघतात (आपल्या सारखी! ) की त्यांना पालक चांगले बनवतात? 

सुजाण पालक रेसिपी?
माझ्या वाढीव आठवणीमध्ये पालक म्हणजे, लहानपणी सर्वे-सर्वा, तरुणपणी इमोशनल पंचींग बॅग्स, मोठेपणी ’क्योंके सां़स भी कभी बहू थी’. त्यांच्याशी ’मुलं कशी वाढवावी’ या विषयावर चर्चा करायचा प्रसंग आधी कधीच आला नव्हता. मी अगदी स्वतःच्या घडणावळीला आदर्श मानत, खुद्द जन्मदात्यांनाच पालकरहस्य विचारायचं ठरवलं. उत्तरा करता फार वाट पाहावी लागली नाही. “तुम्ही चांगले निघालात हेच खरं सगळ्यात मोठ्ठ आश्चर्य आहे. ” घ्या आली का पंचा‌ईत. आमच्या चांगुलपणाचंच आश्चर्य! “खरं तर आम्ही फक्त खूप प्रेम, चांगला आदर्श आणि भरपूर वेळ, या खेरीज स्पेशल असं काहीच केलं नाही”. आता आमच्या चांगलेपणाच आश्चर्य खुपलं तरी, बाकी गोष्टी अंतर्मुख करायला लावणाऱ्या होत्या. प्रेम, आदर्श…. जमेल, अगदी नो प्रॉब्लेम. म्हणजे सत्यमेव जयते, दारू-सिगरेट बंदी, शांती, सुविचार वगैरे. पण पालक रेसिपीतला भरपूर वेळ, तो कोणत्या मॉल मध्ये मिळतो? 

तेझा़ब सिनेमातलं अनिलकपूरने माधुरीला रोखून आणि मंदाकिनीला टेकून फेकलेलं वाक्य आठवयं? “वो क्या है के… टा‌इम मिलता नही है, निक्कालना पडता है।” तरुणपणी सिनेमा पाहताना ओरडून सांगावंस वाटायचं (अजूनही वाटतं), अग माधुरी, त्याला सोड, इकडे ये, माझ्याकडे टा‌इमच टा‌इम आहे. आता या अप्सरे करता टा‌इम कुर्बान (निदात सिनेमा पाहण्यात) करायला तत्पर असणाऱ्या बापांची सद्य परिस्थिती खालच्या फॉर्मुल्यात मांडता ये‌ईल. मान्य आहे, आयांनातर याच्या पेक्षा अनेकपट जास्त घडामोडींना सामोरं जावं लागतं. ऍग्रीड. पण पोळ्याच्या एका दिवशी नंदीला सजवलं तरी गोमातेच महत्त्व आणि माहात्म्य कमी होत नाही. काळजी नसावी.
मुलांसोबत घालवलेला नॅनो वेळ = २४ – (पैसे आणि थोडे अजून पैसे कमावण्यात गुंतवलेला वेळ) – (क्रिकेट बघण्यात आणि बोलण्यात गुगली गेलेला वेळ) – वर्गमूळ(झोप) – (बायको सोबत प्रेमाच्या चार गोष्टी करण्यात घालवलेला काल्पनिक वेळ)

आता या नॅनो क्षणांतला, प्रत्येक क्षण कसा प्रॉडक्टीव्ह हवा. अशी प्रॉडक्टिव्हिटी वाढवायलाच तर कंपनी भरमसाठ पगार देते. घरीपण तेच सूत्र. डु मोर विथ लेस. उदाहरणच द्यायचं म्हणजे, फक्त कोणत्या पानावरचा होमवर्क संपवायचा आहे सांगून तासाभरात तो न सांगता संपला पाहिजे. गणित, तबला, डान्स, घुडसवारी, चित्रकला, संगीत या कलांमधलं नैपुण्य जपून वर्गातला पहिला नंबर जपला पाहिजे. भितींवर पाढ्यांचा चकाचक तक्ता लावून एका आठवड्यात सतरा चोक विचारलं (सेव्हंटीन फोऱ्झ्झा) की लग्गेच उत्तर आलं पाहिजे. आठ वर्ष म्हणजे काय खेळायचं आणि बालिशपणाचं वय आहे? डोळे मोठ्ठे केले की पाहुण्यांसमोर मांडलेला उच्छाद बंद हो‌ऊन खेळणी (अख्ख्या कॉलनीला पुरतील एवढी) जागच्या जागी गेली पाहिजेत. अश्या ह्या, आपल्या प्रॉडक्टचा विचार न करता भरकटलेल्या प्रॉडक्टीव्हिटीच्या अपेक्षा. 

पालक रेसिपीत, भरपूर वेळेसोबत, अनेकजण थोड्याफार प्रमाणात आपल्या आवडीनुसार, आणि लहानपणी तयार झालेल्या टेस्ट नुसार, ’धाकाचा कोळ’ पण घालतात. अनेकांच्या मते त्याने मुलांचा अर्क काढण्यात मदत होते. पण जेवणातल्या मिठासारखा थोडा जरी जास्त झाला तर मुलं अर्क होण्यात हातभार लावतो असं मला वाटत. आत्या, काका, बाबा जमले की गप्पा रंगतात, आजोबा टांग्यातून घरी आले की सगळी पोर, जमेल तितक्या लवकर कशी नजरे‌आड व्हायची, आणि अभ्यासाला लागायची. मला परवा स्वप्नात दिसलं की मी मोटारीतून उतरल्याच पाहून पोरं बाबाच्या धाकाने पुस्तकात मुंडी घालून पाढे घोकत बसलेत अन बायको अहो आले घरी या आनंदात गाणी गात…. असो. स्वप्न मोडलं आणि विचार केला, खरच का यात मजा आहे? आजोबांनी “मस्ती टाऽऽऽईम… ” अशी आरोळी ठोकून, मुलांची बाबाला आधी चीत करायची चेंगाचेंग अनुभवली असती तर ते पण जरा चील‌आ‌ऊट झाले असते. तो धुडगूस नकोसा झाला तरी, नसला तर चुकचुकतो. एवढा धाक ठेवून त्यांनी काय कमावलं आणि त्यांच्या पोरांनी काय गमावलं हा सवाल आता कोण करणार?
काही पालकांची अपेक्षांची पद्धत जरा हटके असते. त्यांच्या अपेक्षा अमाप विश्वासात दडलेल्या असतात. आता स्वतःचंच उदाहरण द्यायचं तर, आ‌ईचा अमाप विश्वास होता (अजून आहे का माहिती नाही), की आपला पोरगा सिगरेटीला हात (तोंड) लावूच शकणार नाही. हे ती मला दहादा बोलूनही दाखवायची. आता हॉस्टेलला राहून एखादा झुरका घेतलाही असेल, पण तो धूर आतून पोखरून काढायचा, मन खायचं की आपण विश्वासाला तडा देतोय. मागे वळून पाहता वाटत की दुसरा झुरका नाकारून अनेक झुरक्यांना टाळलं खरं. आता आम्ही चांगले होतो म्हणून हा (अंध)विश्वास खपून गेला की पालकसत्वाचा हा झणझणीत रस्सा बाकी ठिकाणीपण सेम झटका दे‌ऊन जातो? (पोरी फिरवूच शकणार नाही हा विश्वास पाळून काय वांधे झाले ते सांगणे नको! )

असे पालक रेसिपीतले अनेक जिन्नस पडताळून झाले पण त्यांचं प्रमाण आणि माप न समजल्याने डोक्यातला गोंधळ वाढतोय आणि डोक्यावरचे केस पिकायला लागलेत.

थोडीसी जमी, थोडीसी दिशा, आणि (जमल्यास) थोडा आसमां
आपण जसे वाढलो, दाढी ये‌ईल इतके आणि क्रेडिट कार्ड, मोटार लायसन्स मिळेल इतके मोठ्ठे झालो तसेच नवीन पिढीतले का बरं वाढले पाहिजेत? त्याचं वातावरण वेगळं आणि सुखसोयीपण. वडिलांचा रिटायर्मेंटवेळचा वर्षाचा पगार, अनेक तरुण मंडळी महिन्यात कमावून उडवतात, यात मोठेपणा त्यांचा की मार्केटचा हा प्रश्न मिनिटभर बाजूला ठेवला तरी स्टॅंडर्ड ऑफ लीव्हीग, उच्च शिक्षण आणि सुखसोयींवर खर्चाच्या सोयीतली (डिसपोझिबस इनकम) वाढ लक्षात घेण्या जोगी आहे. आजच्या मुला-मुलींना ग्लोबल इक्पोझर मिळणं किती सोपं झालंय. तुम्ही आम्ही जर आ‌ई-बाबांच्या चौपट, अष्टचंगात अडकलो असतो तर, चेस च्या मजेला मुकलो असतो. तश्यातलाच प्रकार आपण आपल्या लहानांवर तर लादत नाहीये ना? 

बरं, नवीन पिढीला मिळणारी व्हिडि‌ओ गेम्सची मजा तुम्ही आम्ही लहानपणी पत्ते आणि व्यापार खेळून जगत होतो. त्यांचा इंटरनेट वरचा रिसर्च आपण अनेक पुस्तक कुरतडून करत होतो. मुद्दा त्यांना दिवस-दिवस गेम्स खुळू देत आणि इंटरनेट वर बसू देत असा नाहीये. पण थोडी मुभा द्यायला काय हरकत आहे? व्हिडि‌ओ गेम खेळून त्यांचा सर्वांगीण विकास नाही झाला तरी बाकी अनेक स्कील्स ते विकसित करून शकतात. तुम्ही ठरवा नं कोणते गेम खेळायचे आणि कोणत्या संकेतस्थळांना त्यांना जाता ये‌ईल ते (कंप्युटरवर पालकांना मुलांना गूगलवर ध चा मा करू नये याची सोय असते). पण आमच्या लहानपणी असलं नव्हतं. आम्ही पाच भावंड एक खेळणं खुळून मोठे झालो, हे तत्त्व का? त्यांच्या नशिबानं मिळालंय तर आपली तडफड कशाला? 

आपल्या पैकी अनेकांच जरा गुलमोहरासारखं झालं, आजूबाजूला पेटल्या शिवाय आपण काही मोहरलोच नाही. आपला गुलमोहर झाला पण नवीन पिढीचा सदामोहर हो‌ऊ शकतो का (आयुष्यातले झटके न खाता)? खरतरं मागे वळून पाहता, नवीन पिढी जुन्या पिढीच्या कायम एक पा‌ऊल पुढे असते किंवा असू शकते जर त्या पावलांनी योग्य दिशा घेतली तर. शेवटी अधोगती आणि प्रगती, दोघातही गती आलीच, पण एक उत्तरेला अन एक दक्षिणेला. ही दिशा डझनभर क्लासेस लावून मीळेक का क्वालिटी टा‌इम दे‌ऊन. आणि अभ्यासाचंच म्हणाल तर, आतून हाक आल्याशिवाय रट्टेबाजी शिवाय काही होत नाही हो. शेवटी मुलांना लीडरशीप शिकवायचीये का ग्लोरिफा‌ईड खर्डेगीरी हे पालकांच्या हातात असतं का? जे अनुभव आपल्या मिळाले तेवढेच चांगले ठरवून तेच पोरांना द्यायचे हा अट्टहास का? आपण ज्या संकुचित भाषीकता, जातीयतेत वाढलो त्यातच त्यांना जखडवायचं का त्यांच्यात माणुसकीची आणि वैसुदैवं कुटुंबकम, ही भावना रुजवायची? 

आपल्याला जन्मदात्यांनी अजून काय दिल, किंवा बाकीच्या सुजाण लोकांच्या पालकांनी काय दिलं याचं निरीक्षण आणि परीक्षण केलं तर मला जाणवतंय की ते त्याच्या वारसदारांना थोडा टेकू आणि थोडा धक्का देतात. म्हणजे गुलझा़री भाषेत सांगायचं तर, थोडीसी जमी आणि थोडीसी दिशा. आसमां देता आला तर उत्तमच पण एक टेकू, एक घर जे बाहेरच्या दुनियेत मोठ्या चुका करायच्या आधी छोट्या चुका करायची आणि सुधारायची प्रयोगशाळा बनून पाठीशी उभं राहत. त्यांना चांगल्या वा‌ईटातला फरक समजायची संवेदनशीलता देतं. द्वेष, राग, चीड हे वा‌ईट आणि प्रेम, समजूतदारपणा आणि शांती चांगली, याची कृतीतून जाणीव करून देत, दिशा देत, ते घर. नाहीतर लहानपणी पालक मुलांना बडवतायत आणि मोठेपणी मुलं पालकांवर डाफरतायत, लहानपणी पालकांना पोरांकरता वेळ नाही आणि मोठेपणी पोरांना पालकांच तोंड पाहायचं नाही. काय मतलब आहे? व्हॉट गोज अरा‌ऊंड, कम्स अरा‌ऊंड.

टाटा, बजाज आणि बिरलांच्या पोरांना एलेव्हेटेड लॉंचिंग पॅड मिळाल्याने ते इतके पुढे गेले असतील का? राज्यकर्ते, नटनट्याच घ्या, आ‌ई-बापाचा टेकू घेत घेत अनेकांची वैयक्तिक कारकीर्द उल्लेखनीय आहे. टेकू घे‌ऊन बऱ्याच मंडळींनी आपल्या नशिबाचे फासे पालटले (तुषार कपुर आणि ईशा दे‌ओल सोडून. त्यांचं टेकू घेणं आणि धक्के खाण कधी संपतंय, राम जाने). त्यांचं पाहून वाटतंय की जमल्यास वारसदारांची स्टार्टींग ला‌इन पुढे ढकलायची आणि थोडं वरच लॉंचींग पॅड द्यायचं. आता जमशेदजींच्या आगगाड्यांत रतन अडकून पडला असता तर आज टाटा नाव जगासमोर कोरू शकला नसता. इंदिराची राजनीती राहुलने पाळली असती तर आज पक्षाला शून्यातून वर आणणारा कॅटॅलीस्ट बनू शकला नसता. ते त्यांच्या वेळी योग्य होते (आणीबाणी सोडून! ), हे ह्याच्या वेळी सही आहेत. पण बघा ना, ह्या मंडळींना खूप पुढली स्टार्टीग ला‌इन मिळाली खरी, पण ते धावलेही त्याच जिकिरीने. स्ट्रगल काही सुटत नाही बघा. कोणी हजारा करता स्ट्रगल करत, तर कोणी लाखाकरता, तर कोणी करोड करता. कुणाची धडपड कमावायला, कुणाची कमावलेले टिकवायला तर कुणाची वडिलोपार्जित आलेले वाढवायला. 

॥ याच साठी केला होता अट्टहास, पुत्र, कन्यारत्न, सुजन व्हावे ॥
प्रॉडक्टिव्हिटिचा विचार न करता, पैसा फेको तमाशा देखो न करता, शॉपिंग मॉल्सला कुटुंब संमेलनाची जागा न बनवता, या वेळेत अजून काय कामं करता आली असती याचा विचार न करता, डोस न पाजता, आपण लहानपणी काय दिवे लावले याची उजळणी न करता, मुलांसोबत चेस, पत्ते, व्हिडि‌ओ गेम्स खेळायचे, पुस्तकं वाचायची, गोष्टी सांगायच्या. निरागसता जपून त्यांचं लहानपण जगायचं आणि जगू द्यायचं. ते सगळं करताना दिशा सुधारायला मुभा द्यायची. सोबत वेळ घालून, हसत खेळत अभ्यासाची गोडी लावायची. त्यांना सुजन बनवायचं, एक प्लॅटफॉर्म द्यायचा, थोडी दिशा द्यायची, त्यातून वेळ मिळालंच तर त्यांच्या आवडीचा एखादा क्लास लावायचा. काय म्हणताय वडिलधारी मंडळी, जमणार? 

माझं विचाराल तर, कळतंय पण पूर्णपणे वळत नाही. एक धरलं तर दुसरं सुटतंय आणि दुसरं पकडलं तर तिसरं निसटतंय. दर्द बढता गया ज्य़ो ज्य़ो द़वा की. पाहूया जमतंय का ते, नाहीतरी काय, अजून वीस वर्षांनी (हो, आजोबा व्हायला माझी थांबायची तयारी आहे) आपण सांगायला मोकळे, आजोबा उवाच “बाबा लहानपणी फट्टाफट अभ्यास करून टाकायचा, असा व्हर्च्यु‌अल रियालिटित जा‌ऊन बसत नव्हता. “